जांभळाच्या वाढीसाठी खोल चिकण माती असणारी आणि चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. अशा मातीत जमिनीचा पुरेसा ओलावा टिकून राहतो. चांगले उत्पादन देणाऱ्या जातीची निवड करावी. जांभूळ हे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे फळझाड. झाडाची उंची साधारणपणे २० ते ३५ मीटरपर्यंत वाढू शकते. झाडाची साल खडबडीत असते, फांद्या राखाडी पांढऱ्या रंगाच्या असतात. फेब्रुवारी महिन्यात दिसणारा फुटवा आणि फुलांची निर्मिती करतो. ५ ते १० महिन्यांच्या जुन्या फांद्यावर फुलांच्या कळ्या लागतात. फुले मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतात आणि एप्रिलच्या मध्यापर्यंत चालू राहतात. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात झाडे पूर्ण बहरलेली असतात. फुले मुख्यतः चालू वर्षाच्या फांद्यावर लागतात, फळे १० ते ४० च्या घोसात लागतात. जांभळाचा गर पांढरा व अतिशय रसाळ असतो. फळधारणेनंतर पिकण्यासाठी ६० ते ६५ दिवस लागतात.
ग्रीष्मातील रखरखता उन्हाळा संपताच मृगाची चाहूल लागत असताना सर्वांना हवेहवेसे वाटणारे आणि औषधीयुक्त बहुगुणी फळ म्हणजेच जांभूळ. जांभळ्या टपोऱ्या फळांना खाण्यासाठी व प्रक्रिया केलेले पदार्थ आणि आयुर्वेदिक औषधी बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे, मात्र हे फळ टिकाऊ नाही, त्यामुळे ते पिकल्यानंतर तीन- चार दिवसांत खावे लागते. स्थानिक बाजारपेठेतही जांभळाच्या फळांना चांगली मागणी असते. शहरांतील बाजारपेठांत तर जांभळाच्या फळांना फार मोठी मागणी असते.
जांभूळ हे अत्यंत काटक असे, कोरडवाहू जमिनीत तसेच अधिक पावसाच्या प्रदेशात चांगल्या प्रकारे येणारे एक फळपीक आहे. या झाडाला १०० वर्षांपेक्षा अधिक आयुष्य आहे. भारत देश जांभळाचे उगमस्थान समजला जातो. जांभळाच्या फळामध्ये लोह, खनिजे, शर्करा आणि इतर अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. या फळांचा रस आणि बियांचे चूर्ण मधुमेहासाठी गुणकारी आहे. जांभळाच्या फळांचा रस थंड आणि पाचक असतो